हलो हलो .. हा अरे आलोच
किती वेळ १५ मिनिटात येतो म्हणाला होतास...
अरे हो तेव्हाच निघालो होतो पण ट्राफिक मध्ये अडकलोय ..
कधी निघालास ?
अरे अर्धा तास झाला निघून.... पण काय करणार ट्राफिक किती आहे...
आताही सिग्नलला थांबलो आहे .. चल सिग्नल सुटेल .. ठेवतो..
शांतपणे हा मोबाईल खिशात ठेऊन चहाचा शेवटचा घोट संपवतो आणि दुचाकीकडे चालू लागतो... दुचाकीला किक मारून हा निघतो..
उशीर करण्याची अनेक कारण आहेत ..इथे तर लिस्ट च देता येईल ...
हो आलोच जवळच आहे...अरे ट्राफिक मध्ये अडकलोय...
घरून फोन आला म्हणून उशीर झाला..
पेट्रोल संपल.. त्यामुळे वेळ लागला...
लाईट गेली होती.. अंघोळ राहिली होती
निघालोच होतो पण ऑफिस मध्ये अचानक काम आल..
मीटिंग होती....
अरे मामानी( का मामी ? असा गोड प्रसंग आम्हाला कधी आला नाही बाप्पां ...) अडवलंय....
ATM ला थांबलोय पण खूप मोठी रांग आहे ?
उशिरा येन हा भारतीय लोकांचा गुणधर्मच आहे ..त्यासाठी आपल्याकडे अनेक कारण तयार असतात. त्यातही एक creativity आहे. मुळातच उशीर कारण हि पण एक prestige ची गोष्ट आहे अस आम्ही मानतो.. (जस अजित आगरकर स्वताला अष्टपैलू मानतो). आता उशिरा येन आणि उशीर झाल्यामुळ दिलीगिरी व्यक्त करत दिनवानेपणे कारण सांगणे ... हि तर सर्वसामान्य लोकांची लक्षण आहेत. आता ह्या खेळत निर्ढावलेले उशिरा आल्यावर कस वागतात बघू. मुळात हि लोक १५-२० मिनिट उशीर होण वगैरे क्षुल्लक वेळेला किंमत देत नाहीत .. १५-२० मिनिटाचा तो वेळ त्यात कसला उशीर मानायचा.. तर हि लोक क्वचितच एवढा कमी उशीर करतात. यांचा उशीर म्हणजे १-२ तास उशिरा येन असत.. आता एवढा उशीर केल्यावर समोरचा आधीच वैतागलेला असतो. त्याला अपेक्षा असते हा आल्यावर अत्यंत खजील चेहरा करून येईल, दिलगिरी व्यक्त करेल.. पण हे लोक अत्यंत निर्ढावलेले असल्याने जणू काही वेगळ घडलाच नाही असा चेहरा घेऊन येतात.. अत्यंत मख्ख चेहरा ठेवतात (मख्ख चेहरा....?? अभिनय करत असलेला सुनील शेट्टी अथवा .. नाहीतर कुठल्याही परिस्थितीत खेळत असलेला द्रविड आठवा.. काहीच नाही तर आपले दिग्विजयसिंग आठवा ). समोरचा कितीही वैतागलेला असला त्याचे एकेक बौन्सर सोडून देतात. परत वार करतात कि मी आलो तेच महत्वाच नाही का ? बघा परत कुणाची हिम्मत होत नाही झापायची ...
अल बरुनी नावाचा एक प्रवाशी इ.सनाच्या ११ शतकात भारतात आला होता. (या बाहेरच्या लोकांना काही काम नसतात उठसुठ भारतात येतात भेटी द्यायला आणि उगाच इतिहासाचा अभ्यास वाढवून ठेवतात. उगीच ती चित्रविचित्र नाव पाठ करा. आपली लोक बघा कुठ फिरायला गेले नाहीत ना युध्द करायला. उगीच बाकीच्या लोकांचा इतिहास कशाला वाढवून ठेवा.. ) तर ह्या अल बरुनी या माणसाने भारताविषयी, इथल्या लोकांविषयी बराच काही लिहून ठेवलंय. त्याने म्हटलंय कि भारतातले लोक अस समजतात कि त्यांच्यासारख विज्ञान कुठे नाही , त्यांच्यासारखी संस्कृती, भाषा, गणित कुठेच नाही.थोडक्यात भारतासारख्या प्रगत देश कुठेच नाही अस भारतीय लोक मानतात. (बहुदा हे लिहिताना तो पुण्यात असावा. बघा बघा जुन्या इतिहासकालीन नोंदी काढून पहिल्या पाहिजेत). तर ह्याने भारतीयांच्या प्रत्येक गोष्टींबद्दल अगदी सविस्तरपणे लिहिलंय.खूपच सविस्तर लिहिलंय .. पण आपल्या उशिरा येणाच्या सवयीबद्दल कुठेच काही लिहल नाही. म्हणजे हि सवय जुनी नाही तर अलीकडच्या काळातली असावी. पण हि सवय चटकन फोफावली आणि तिचा चांगलाच विस्तार झाला. आजकाल कुणी उशिरा येत नाही हो ? ऑफिस ला लोक उशिरा जातात. रेल्वे उशिरा धावते. विमाने उशिरा उडतात. नेते सभेला उशिरा येतात. खेळाची मैदान उशिरा तयार होतात. (बघा कोलकाता...) CBI वाले उशिरा धाडी टाकतात आणि काही लोकांना अटक करायला विसरून जातात आणि नंतर उशिरा अटक करतात, विजेचे प्रकल्प सुरु व्हायला उशीर होतो.......... तर आपला सगळा देशच उशिरा चालतो.
आता या उशिरा येण्यातही एक कला आहे. उशिरा आल्याची कारण सांगण हा नंतरचा भाग झाला. पण उशीर करणं हि कला समजून घेतली पाहिजे.
तुम्हाला अचानक काहीतरी महत्वाच काम निघाल, ट्राफिक मध्ये अडकलात, वेळेवर झोपेतून उठला नाहीत म्हणून तुम्हाला उशीर झाला तर हि एक सर्वसामान्य बाब आहे. यात कसली आलीय creativity ? खर कसब तर यापैकी कोणतीच गोष्ट घडली नसताना उशीर करणे यात आहे . आता या कलेत पारंगत मंडळी कसा उशीर करतात पाहू. या लोकांना आता बाहेर निघायचं आहे आणि हे आवरत आहेत. आतापर्यंत सगळ वेळेवर झालाय आणि हे वेळेवरच पोहोचणार अस एकंदरीत चित्र आहे. नेमक बाहेर पडण्यापूर्वी आरशात पाहताना यांना जाणवत कि शर्ट काही match होत नाही. मग हे आपल्या सोबत्याला विचारतात तो म्हणतो (नेहमीप्रमाणेच) अरे मस्त दिसतोय ना.. याला काय झाल ? तरीही हे शर्ट बदलतात. पण त्यानंतर लक्षात येत कि आधीचाच चांगला होता. मग पुन्हा तो शर्ट घातला जातो. ह्यामध्ये एक १० मिनिट निघून जातात (अजून काही पुरेसा उशीर झाला नाही). मग पुढे हे पादत्राण घालायला जातात. बाहेर पडणार एवढ्यात लक्ष्यात येत अरेच्चा मोबाईल राहिला वाटत, पुन्हा आत पळतात. मग रीतसर घराला कुलूप लाऊन बाहेर पडणार तेवढ्यात यांच्या लक्षात येत अरे चहा पिला पाहिजे आणि सोबत जळती काडी पेटवली पाहिजे (हि लोक तर प्रत्येक ठिकाणी उशीर करतात). पुन्हा त्या कार्यक्रमात १५-२० मिनिट जातात. आता सगळ आवरून एकदाच बाहेर पडतात. घरातून रस्त्याकडे चालायला लागतात आणि एकदम काहीतरी आठवल्यासारख करून पुन्हा घराकडे पळतात. आता यावेळी काही विसरलेल नसत. हे त्यांच्याही लक्षात येत. पण घराच्या बाहेर थांबलेल्या आपल्या सोबत्याला (सख्याला) वाटू नये कि हा उगीच परत गेला म्हणून थोडा वेळ घरात रेंगाळतात.
अशा रीतीने चांगला पाऊन एक तासाचा उशीर केल्यानंतर यांच्या जीवाची शांती होते.
तर या उशीर करण्याच्या कलेबद्दल मी लिहल. पण उशिरा आल्याबद्दल कारण सांगणे याबद्दल काय वेगळे सांगणे नलगे...
यात सगळे भारतीय एवढे निपुण आहेत आहेत कि ते कधी आपल्या दूरच्या आजीला मारतील , कधी गाडी puncture करतील, कधी मित्राचा अपघात करतील हे सांगता येत नाही !!! तुम्हालाही असे बरेच अनुभव -प्रती-अनुभव आले असतील त्यामुळे या गोष्टी मी वाचकांच्या कल्पनाशक्तीवर सोडून देतो.
उशिरा येण हि मुळात आपली राष्ट्रीय संकृती आहे त्यामुळे यापुढे उशीर झाला तर अजिबात वाईट घेऊ नका. उशीर करा आणि समोरचा उशिराच येईल अशी अपेक्षा करा (अर्थात तुम्ही यात आधीच निगरगट्ट आहात हे ओळखतो आम्ही..)
त्यामुळे याबद्दल जास्त न बोलता मी आपले उशीर पुराण संपवतो.